नातं नवरा-बायकोचं..
*_पुढे लिहिलेली कविता पुर्णपणे (अ) काल्पनिक असुन तिच्यातील नवरा-बायको यांचा वास्तविकतेशी संबंध नाही. (जर तसा काही संबंध आढळून आल्यास शांत रहा. कारण तुम्ही त्याबद्दल काही बोलू शकत नाही)_*
नवरा-बायको नात्यामध्ये बायकोचं नाणं खरं असतं,
शांत रहावं अशा वेळी कारण हुज्जत घालणं बरं नसतं...
उपदेशाच्या बोलाची कधी टाळाटाळ करु नये,
चुकून सुद्धा बायकोची वस्तू गहाळ करु नये...
जेवणाच्या तक्रारींना मुकाट्याने गिळायला शिका,
सांगायच्याच असतील तरं, आधी पीठ मळायला शिका...
कपड्यांच्या रंगसंगती तुम्ही कधीच ठरवू नका,
रागावलेल्या बायकोला चुकूनही प्रेमाने भरवू नका...
ठरवलेल्या Plan मध्ये बदल करुन फसु नका,
गंभीर झालेल्या चेह-यावर उगीचच कधी हसू नका...
भांडी मांडताना येणा-या आवाजात संगीत शोधा,
खरेदी करा तिच्यासाठी, कपडे अगदी रंगीत शोधा...
गोष्ट कोणती करताना बायकोकडे मानेचा बाक असतो,
साध्या भोळ्या नव-याला तिच्या डोळ्यांचा धाक असतो...
संसाराच्या ताटामध्ये, बासुंदी सारखी गोडी हवी,
कधीतरी खरडा म्हणून, भांडणं ही थोडी हवी...
आपले मुद्दे मांडण्याची कला तुम्हाला यायला हवी,
स्वत:बरोबर बायकोची काळजी तुम्ही घ्यायला हवी...
कितीही काही झालं तरी तिला तुमचाच आधार आहे,
कडु, आंबट, गोड, तिखट. हाच संसाराचा सार आहे...
-विक्रम वाडकर 2017/10/26 15:24
Comments
Post a Comment