बहीण...

सासरी जाणारी बहीण हा चटका लावणारा प्रसंग असतो. त्याची कल्पना करून सुद्धा डोळे भरून येतात. कंठ दाटून येतो. जश्या आई वडिलांच्या आपल्या पोरीसाठी भावना उफाळून येतात, तश्याच भावाच्या मनातही असतात..  काहीशा अल्लड.. काहीश्या अवखळ..  काही उनाड.. काही जीवापाड..काही खळखळलेल्या.. काही घुसमटलेल्या.. तशाच काही भावना.. माझ्या मनातल्या..

लहानपणी तुला उचलून घेऊन फिरायचो,
आज सुद्धा मी तेच केलं.. कुठेही जाताना तुला हात पकडुन न्यायचो,आज सुद्धा मी तेच केलं..
छोटी भांडी खेळता खेळता तू खूप मोठी झाली.. छोटी खेळणी सांभाळणारी मोठा संसार थाटायला निघालीस.. मला घेतलेली गोष्ट तुला मिळेपर्यंत रडायचीस.. तुझी वस्तू घेतली की खूप खूप चिडायचीस.. आता तुझ चिडण माझ्यासाठी नसेल.. त्याच मात्र दुःख माझ्या मनात असेल.. हट्टी होती तू जी सारखी मागे लागायची..  नको नको बोललं तरी तुझच तू वागायची.. लाड करायचे सारे कारण तू गोड होती.. प्रत्येक खोडीत तुझ्या, माझीही तुला जोड होती.. गोष्टी समजावून सांगायला मला कधीच जमलं नाही.. पण तुझ्या बोलण्याने तूच सगळ्यांच्या मनात राही.. आजपर्यंत मी तुझ्याशी खूप भांडलो असेन..मात्र.. इथून पुढे इतरांशी भांडताना मीच तुला दिसेन.. मला कोणतीही गोष्ट तू आजवर नाही मागितली..  पण तुला हवी असणारी गोष्ट मी तुझ्या डोळ्यात बघितली.. ना जाणे किती तुला, देत आलोय मी त्रास.. पण इथून पुढे घरात तुझाच असेल मला भास.. आऊ आणि पप्पाची काळजी तुला दिसेल .. माझ्या मनातल्या घालमेलीची मात्र कल्पनाच तुला नसेल.. मी केलेल्या चुका तू घालशील ना ग पोटात.. सासरी गेल्यावर माझ नाव ठेवशील ना ओठात.. माझी तुझ्या मनातली जळमटं आज तू साफ कर.. तुझ्या या दादाला.. आज मनापासून माफ कर.. तुझ्या या दादाला.. आज मनापासून माफ कर.. ||

-- विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १