चहा आणि आठवण

उकळणाऱ्या चहासोबत आठवणींची गरमागरम वाफ चेहऱ्यावर आली...  मग खऱ्या खोट्याच्या स्वच्छ चाळणीतून आठवणींची धार मनाच्या कपमध्ये भरली..
चहाचा कप घेऊन शांत पणे खिडकीजवळ जाऊन बसलो.. पहिल्या झुरक्याबरोबर जिभेला चटका बसावा अशा काही आठवणी चटका लावून गेल्या..
मग हळू हळू त्या चहाची ऊब ओठातून पोटात, पोटातून शरीराच्या रोमरोमात ऊर्जा देऊ लागली..
मग खरेच आयुष्यात आपण जे काही चांगले केले त्याचे हिशोब चालू झाले.. ज्यांनी जीवनात चांगले वागण्याचे संस्कार दिले त्या आई बाबांची, ज्यांनी चांगल्या वाईट परिस्थितीत साथ दिली त्या मायाळू मित्रांची,खोड्या काढत आनंद शिकवणाऱ्या बहिणीची, मी आहे तसा माझा स्वीकार करणाऱ्या माझ्या सहचारिणी ची, आणि काहीवेळा अनोळखी असून माझ्यातील चांगुलपणा जाणवून देणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तींची आर्ततेने आणि ऋणी भावाने आठवण आली.. कधी आपल्याच वागण्याचा राग यावा अशा क्षणांनी मनात चीड वाटली.. कधी इतरांनी केलेल्या चुकीच्या गोष्टींनी मन उदास झाले.. पण मग विचार आला. सगळं चांगलं घडत असेल तर वाईट उरणारच नाही. आणि वाईट नसेल तर चांगुलपणा काय असतो हे कळणारच नाही. पण आपल्या जगण्याचं पारडं चांगल्याकडे ठेवायचं. वाईट घडणार नाही याचा काही भरोसा नाही. निसर्ग सगळ्यांना सगळच देतो का? नाही. पण प्रत्येकाला काहीतरी वेगळं सत्व नक्कीच देतो.
आयुष्य दगडासारखे कठोर नसतं आणि मातीसारख मृदू ही नसतं. चांगुलपणाच पाणी शिंपडून, आयुष्याला घडवून त्याला मूर्ती आकार देणं आपल्या हातात असतं.
ही जाणीव मनात येते न येते तो शेवटचा चहाचा घोट पोटात गेला. सर्व आठवणी गोळा करत कप उचलला आणि निघालो.. मग निघून जाताना लक्षात आलं, चहाचा कप आपली आठवणींची गोलाकार कड सोडून आला, आपलं ही असच असत.. पुढे जाताना पाठी काहीतरी सोडूनच जावं लागतं. आणि आयुष्य हे असच जगावं लागतं..

- विक्रम वाडकर  2018/10/15 11:49

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १