तुझ्या मिठीची ही साखळी.. हवीहवी..

तुझ्या आठवांची वेळ..ऊन पावसाचा खेळ..
गहिवरल्या आनंदाची फुलते पाकळी..
तुझ्या मिठीची ही साखळी.. हवीहवी..

एकतारीच्या सुरात.. गुणगुणते आज मी..
सुखाच्या पावलांत.. रुणझुणते आज मी
तुझ्या सुगंधात दरवळणारी.. रातराणी मी नवी..

काजव्याच्या प्रकाशाने.. लखलखते जणू रात..
तुझ्याच हलक्या स्पर्शाने.. टाकते मी जुनी कात..
अलगुज कानी सांगणारी.. ऐकू येई भैरवी..

नजरेच्या या खुणांनी.. उरी भावनांची भरती..
संसाराच्या गोड स्वप्नांनी.. दिन रात माझे सरती..
दर्पणात लाजते मी.. पाहूनी तुझी छवी..
-विक्रम वाडकर 19/05/2015 10:03 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १